नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार, पुरामुळे 60 जणांचा मृत्यू; 36 जण जखमी

नेपाळमध्ये शुक्रवारपासून पावसाने हाहाकार माजवला असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे 60 लोकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. 60 मृत्यूंपैकी 34 मृत्यू काठमांडू खोऱ्यात, 19 बागमती प्रांतातील 5 जिल्ह्यांमध्ये आणि 7 कोशी प्रांतात झाले, अशी माहिती नेपाळ पोलिसांचे उप प्रवक्ते बिश्वो अधिकारी यांनी सांगितले.

पृथ्वी महामार्गालगत धाडिंग जिल्ह्यातील झापले खोला येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेल्या दोन वाहनांमधून 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले. याव्यतिरिक्त, देशभरात सुमारे 44 लोक बेपत्ता आहेत, ज्यात काठमांडू खोऱ्यातील 16 जणांचा समावेश आहे.

काठमांडूमधील 226 घरे पाण्याखाली गेली आहेत. बचावासाठी 3,000 सुरक्षा कर्मचाऱ्यांचे पथक बाधित भागात तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत 1000 हून अधिक नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशातील आपत्कालीन स्थिती लक्षात घेता पंतप्रधान प्रकाश मान सिंह यांनी गृहमंत्री, गृह सचिव आणि सुरक्षा संस्थांच्या प्रमुखांसह विविध मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली. शोध कार्य आणि बचाव कार्य तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.