मुंबई रुग्णालयातील कामगारांना 55 ते 80 हजार सानुग्रह अनुदान; भारतीय कामगार सेनेचा डंका, व्यवस्थापनासोबत यशस्वी बैठक

भारतीय कामगार सेनेच्या भक्कम आणि खंबीर नेतृत्वामुळे मुंबई रुग्णालयातील कामगारांची दिवाळी गोड झाली आहे. भारतीय कामगार सेना मुंबई रुग्णालय युनिटचे चिटणीस, शिवसेना उपनेते संजय सावंत, युनिट अध्यक्ष राजू नायर व अन्य पदाधिकारी तसेच व्यवस्थापन समिती यांच्यातील समन्वयातून कामगारांना 20 टक्के सानुग्रह अनुदान (55 ते 80 हजार रुपये) आणि प्रलंबित पगारवाढीतील आगाऊ रक्कम ग्रेडप्रमाणे देण्यावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे कामगारांना दिवाळीचे खास गिफ्ट मिळाले आहे.

भारतीय कामगार सेनेच्या मुंबई रुग्णालय युनिटने व्यवस्थापनाशी यशस्वी बोलणी करत सानुग्रह अनुदान आणि प्रलंबित पगावाढीबाबत कामगारांना आनंदाची बातमी दिली. बैठकीवेळी संजय सावंत व राजू नायर यांच्यासह सचिव दिलीप गायकवाड,उपाध्यक्ष रवींद्र पवार, हेमंत पाटणकर, संदीप तावडे, मंजू वीर, महेश डूगर्शी, खजिनदार जयेश तळेकर, मनोज कदम, संजय चौकेकर, गणेश वरणकर, सुकुमार कांबळे, रमेश कसबे उपस्थित होते.

कामगारांना 20 टक्के सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. ही रक्कम 55 हजार ते 80 हजार इतकी असणार आहे. त्याचे वितरण  दिवाळीपूर्वी 21 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

प्रलंबित पगारवाढीतील आगावू रक्कम ग्रेडप्रमाणे 24 ऑक्टोबर रोजी वितरीत केली जाणार आहे. एलटी-एल 1 ते एल 5 – 75 हजार, सी 1 ते सी 5 या ग्रेडसाठी 80 हजार रुपये तर एन 1 ते एन 4 आणि एस 1 ते एस 5 या ग्रेडसाठी 85 हजार रुपये आगाऊ रक्कम मिळणार आहे.

अंतिम पगारवाढीवर दिवाळीनंतर चर्चा

अंतिम पगारवाढीसंदर्भात दिवाळीनंतर व्यवस्थापनासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, असे शिवसेना उपनेते संजय सावंत यांनी सांगितले. सर्व कामगारांनी एकजुटीने भारतीय कामगार सेनेच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.