5 लाख घेऊन तोतया पोलीस पसार, खार येथील घटना

एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या तरुणाला गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी असल्याचे भासवून 5 लाख घेऊन चोरटय़ाने पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार यांच्या चुलत भावाचा मनी ट्रान्स्फरचा व्यवसाय आहे. पैसे गोळा करून पंपनीच्या खात्यात टाकत असतात. शनिवारी सायंकाळी त्यांच्या चुलत भावाने 5 लाख 70 हजार रुपये खात्यात जमा करण्यासाठी दिले होते. रात्र झाल्याने ते रविवारी सकाळी पैसे भरण्यासाठी खार 16 वा रोड येथील एका सरकारी बँकेच्या एटीएम मध्ये गेले होते. सुरुवातीला त्यांनी 70 हजार रुपये खात्यात भरले. उरलेले पाच लाख रुपये ते खात्यात भरणार होते. अचानक दोन जण तेथे आले. त्यांनी ते गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे भासवले आणि रोकड घेऊन पोबारा केला.

चौकशीच्या बहाण्याने तरुणाला नेले

चौकशी करायची असल्याने सोबत चल असे सांगून त्यांना बाहेर येण्यास सांगितले. तेव्हा त्याने कशासाठी चौकशीसाठी नेत आहेत अशी विचारणा केली. कार्यालयात गेल्यावर सांगू असे सांगून तक्रारदारांना गाडीत बसण्यास सांगितले. त्यानंतर एका ठगाने त्याची पैशाची बॅग तपासली. ते पैसे कुठून आणले अशी ठगाने विचारणा केली. विचारणा केल्यावर तक्रारदार याने ते पैसे मनी ट्रान्सफरचे असल्याचे सांगितले. ठगाने दमदाटी करून गाडीत बसवले. काही अंतर गेल्यावर ठगाने आणखी काहीना पकडायचे आहे असे सांगून तक्रारदार याना सांताक्रुझ परिसरात आणले. त्यानंतर ती पैशाची बॅग घेऊन ठग हे पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली.