कर्जतमध्ये पाच कोटींच्या बनावट सिगारेटचा धूर; 15 जण ताब्यात

रायगडच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागाने कर्जतमधील पाच कोटींच्या बनावट सिगारेटचा धूर काढला आहे. कर्जतच्या सांगवी गावातील एका आलिशान फार्महाऊसमध्ये गोरखधंदा सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली त्यानुसार पथकाने छापेमारी केली. यावेळी पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून हा धंदा उद्ध्वस्त केला आहे.

सांगवी येथील अब्बास नावाच्या फार्महाऊसमध्ये बेकायदेशीर बनावट सिगारेट बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या फार्महाऊसवर छापेमारी केली असता त्या ठिकाणी एका गाळ्यामध्ये गोल्ड फ्लॅग कंपनीच्या नावाचे बनावट सिगारेटनिर्मिती सुरू असल्याचे दिसून आले. त्यानुसार पथकाने कुमार विश्वकर्मा, कम्मारी राजेश्वर, लेक राम सोनी, महमद बशीर, नारायण सर्यनारायण, सिद्धार्थ कोल्हटकर, मनोहर खांडेकर, दुर्गाप्रसाद अनुसुरी, रवी पिथानी, युसुब शेख, कैलास कोल्हटकर, मनीकंटा लावीटी, हरिप्रसाद चाकली, सोहेल सिंग, हरीश मोर्या अशा १५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी २ कोटी ३१ लाख ६० हजार रुपये किमतीच्या तयार सिगारेटचा साठा,१५ लाख ८६ हजार ९०० रुपये किमतीचे सिगारेटसाठी लागणारे साहित्य व २ कोटी ४७ लाख रुपये किमतीच्या सिगारेट तयार करण्याकरिता लागणाऱ्या मशिनरी असा एकूण ४ कोटी ९४ लाख४६ हजार ९६० रुपयांचा माल जप्त केला आहे.