40 व्या दिवशी सरकारला सोडणार नाही; मनोज जरांगे यांचे सरकारविरोधात रणशिंग…

आंतरवाली सराटीत आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. सरकारला आम्ही 40 दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मात्र आरक्षण मिळाले नाही तर 40व्या दिवशी आम्ही सरकारला सोडणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

आंतरवाली सराटी गावात साखळी उपोषण करत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी बीड जिह्याच्या दौऱयावर जाण्याअगोदर आज 26 सप्टेंबर रोजी पत्रकाराशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या वेळी जरांगे-पाटील म्हणाले की, ‘‘कायदेशीर लढाई म्हणून आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर ते अजिबात चालणार नाही. अशा पद्धतीने मराठा समाजाला प्रत्येक वेळेस हुलकावणी दिली गेली आहे. आता आम्हाला वेठीस धरू नका. तसेच 65 लाख अभिलेखांपैकी 5 हजार कुणबी नोंदी सापडल्या असतील तर आरक्षण देण्यासाठी त्या अभिलेखांचे पुरावे भरपूर झाले आहेत. सरकारला फक्त पुरावे, आधार लागत होता. आरक्षण देण्यासाठी संत-मंहतांनी पुरावे दिले. तसेच आता सरकारला पुरावे सापडलेत, आरक्षण देण्यासाठी ते पुष्कळ पुरावे आहेत. आम्ही वेळही दिलाय. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण कसे द्यायचे, ते आता सरकारने ठरवले पाहिजे. पण 40व्या दिवशी आम्हाला आरक्षण हवेच, बाकीची कारणे सांगू नयेत, आम्ही सरकारला सोडणार नाही, असेही मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री येथे येऊन गेलेत. आम्ही सरकारकडून वेळ घेतला नाही. सरकारनेच आमच्याकडून वेळ मागून घेतला आहे. मराठय़ांचं नुकसान व्हायचं राहिलंय कोणतं? मराठय़ांचं सगळं वाटोळं झालंय. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

विरोध करून पापाचे धनी होऊ नका
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱया मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन 30 दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. दरम्यान, 14 ऑक्टोबरला सरकारला देण्यात आलेल्या मुदतीचे 30 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे 14 ऑक्टोबरला मराठा समाजाची संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर सर्व पक्षांनी मराठा समाजाच्या गोरगरीब पोरांच्या पाठीमागे रहावं, मराठा समाजाने सर्व पक्षांना सुखात ठेवण्यासाठी 70 वर्षे मदत केली. त्यामुळे याचा विरोध करून पापाचे धनी होऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.