भिवंडीत एकाच दिवशी 39 जणांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; श्वानांचे निर्बिजीकरण दहा वर्षापासून रखडले

प्रातिनिधीक फोटो

शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून विविध भागामध्ये एका दिवसात 39 जणांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण गेल्या दहा दिवसांपासून रखडले असल्याने नागरिकांच्या जीवालाच धोका निर्माण झाला आहे. शहरातील रस्त्यांवरून चालतानाही नागरिकांना भीती वाटते.

नदीनाका व मीठपाडा या भागातील एका भटक्या कुत्र्याने सोमवारी 13 जणांना चावा घेतला. यामध्ये शमीम शेख (35) या युवकाच्या चेहऱ्यावर हल्ला चढवल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या सर्वांना इंदिरा गांधी स्मृती शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे रुग्णांना रेबीज लस व प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले, तर शमीम शेख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवसभरात इंदिरा गांधी रुग्णालयात 39 श्वानदंशाचे रुग्ण आले असून त्यामध्ये नदीनाका परिसरातील तिघांचा समावेश आहे. त्यापैकी शमीम शेख यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती आय. जी. एम. रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली.

या भागात भीतीचे वातावरण
भिवंडीच्या शांतीनगर, इदगाह रोड, नदीनाका, कामतघर येथे भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. जुलै महिन्यातदेखील एकाच दिवशी 135 जणांचा चावा कुत्र्यांनी घेतला होता. सोमवारी पुन्हा नागरिकांवर या ‘अतिरेकी’ कुत्र्यांनी हल्ले करत आपली दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत जायलादेखील घाबरत असून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे.