दिल्लीच्या NSG कॅम्पमध्ये आढळला जवानाचा मृतदेह

दिल्लीमधील NSG कॅम्पमधून एक धक्कादायक घटना उघकीस आली आहे. NSG च्या सुदर्शन कॅम्पमध्ये एका 31 वर्षीय जवानाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (5 नोव्हेंबर 2024) एनएसजी सुदर्शन कॅम्पमध्ये असलेल्या शिव मुर्तीच्या शेजारी 31 वर्षीय जवान नरेंद्र सिंह भंडारी यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता मृत नरेंद्र सिंह भंडारी यांनी स्वत:वर गोळी मारल्याचे उघड झाले. याप्रकरणी फॉरेन्सिक आणि मोबाईल क्राईम टीमने तपास सुरू केला असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अधिक तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे.