राज्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी 305 कोटी

mantralay

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखडय़ांना आज सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  यामध्ये श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप आणि दर्शन रांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. तर नाशिक जिह्यातील  भगूर  येथील स्वातंत्र्यवीर  सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीम पार्प साकारण्यात येणार असून  त्यासाठीच्या 40 कोटी रुपयांच्या प्रस्तावास तसेच पहिल्या टप्प्यातील 15 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. मुंबईवरील ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब या सशस्त्र दहशतवाद्यास जिवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या सातारा जिह्यातील केंडबे (ता. जावळी) येथील मूळगावी  स्मारक उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीस बैठकीत मान्यता देण्यात आली.