सातारा विभागातील 300 एसटी बसेस कालबाह्य; अस्वच्छ, नादुरुस्त, गळक्या बसेसमधून नागरिकांचा प्रवास

ग्रामीण भागातील गरिबांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी लालपरीची (एसटी) समस्या बिकट झाली आहे. एसटी महामंडळाच्या सातारा विभागातील 11 आगारांतील सुमारे 300 बसेस कालबाह्य झाल्या आहेत. या बसेसनी सुमारे 10 वर्षांची वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे कालबाह्य बसेस कुठेही बंद पडत असल्याने प्रकाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

एसटीची संख्या कमी असली, तरी एसटीने विविध सवलतींचा वर्षाव सुरू केला आहे. त्यामुळे एसटीकडे मोठय़ा संख्येने प्रकासी आकर्षित झाला आहे. दिवसेंदिवस एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढू लागला आहे. त्यामुळे तोटय़ात गेलेली एसटी आता विविध सवलतींमुळे फायद्यात येऊ लागली आहे. परंतु जुन्या व कालबाह्य झालेल्या बसेस कुठेही बंद पडू लागल्या आहेत. अस्वच्छ, नादुरुस्त व गळक्या बसेस रस्त्यावर धावताना दिसत आहेत. जिह्यातील ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या मार्गावरती जुन्या बस धावत आहेत. त्यामुळे वाढलेल्या प्रवाशांचा भार सोसताना एसटीची दमछाक होताना दिसत आहे.

सातारा विभागात सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, मेढा, पारगाव-खंडाळा, फलटण, कोरेगाव, दहीवडी, वडूज या 11 आगारांत 686 एसटीच्या बसेस आहेत. त्यापैकी 30 बसेस बंद अवस्थेत आहेत. त्यातच आता उपलब्ध असलेल्या 686 बसेसपैकी 300 बस या दहा वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत. तर, दररोज 650 बसेस विविध मार्गांवर धावताना दिसत आहेत.

प्रवाशांच्या तुलनेत सातारा विभागात बसेस कमी असल्या, तरी जास्तीत जास्त प्रकासी वाहतुकीवर अधिकारी व कर्मचाऱयांनी भर दिला आहे. सातारा विभागात नवीन 26 बसेस दाखल झाल्या असून, त्यापैकी सातारा आगारात 16, तर कराड व पाटण आगारास प्रत्येकी 10 बसेस दिल्या असून, या नवीन बसेस स्वारगेट मार्गावर धावत आहेत.

सातारा विभागातून राज्यातील विविध जिह्यांत प्रवासी वाहतूक केली जात आहे. परंतु वेळेकर एसटी उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना 1 ते 2 तास बसेसची वाट पाहावी लागत आहे. अशा परिस्थितीत प्रकाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाकडून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. नवीन बसेस मिळण्यासाठी वारंवार एसटीच्या सातारा विभागामार्फत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरून काहीही हालचाल होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच प्रवाशांना जुन्या बसमधून प्रवास करताना नाहक त्रास सोसावा लागत आहे.

महामंडळाचे नियम धाब्यावर

एसटी महामंडळाच्या एसटी बसेस नियमानुसार 12 लाख किमी धावलेली एसटी प्रवासी वाहतुकीमधून बंद केली जाते. मात्र, हे सर्व नियम धाब्यावर बसवून एसटी बसेस सुसाट धावताना दिसत आहेत. एकीकडे प्रकाशांची सोय तर दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरीही नव्या बसेस उपलब्ध होत नसल्याने जुन्या बसद्वारेच प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचे चित्र सर्रास सर्वत्र पहावयास मिळत आहे.