नेपाळमध्ये बस नदीत कोसळली! महाराष्ट्रातील 27 भाविकांचा मृत्यू

नेपाळमध्ये पोखराहून काठमांडूकडे जाणारी बस नदीत कोसळून महाराष्ट्रातील 27 भाविकांचा मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात काही भाविक वाहून गेल्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता हा अपघात झाला. अपघातातील सर्व मृत जळगाव जिल्हय़ातील भुसावळ तालुक्यातील आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस तसेच लष्कराचे जवान बचावकार्य करत आहेत.

महाराष्ट्रातून जवळपास 110 भाविक नेपाळला गेले असून त्यापैकी बहुतांश जळगाव जिल्हय़ातील आहेत. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील केसरवानी ट्रॅव्हल्सच्या तीन बसने भाविक नेपाळमध्ये गेले होते. 20 ऑगस्ट रोजी या बस नेपाळला पोहोचल्या. 29 ऑगस्ट रोजी हे भाविक मायदेशी परतणार होते. पोखरा येथून काठमांडूकडे येत असताना सकाळी 11.30 वाजता तानाहून जिल्हय़ातील अंबुखेरनी परिसरात एक बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट मर्स्यांगडी नदीत कोसळली. बस नदीत कोसळल्याचे काही स्थानिकांनी पोलिसांना कळवले. अपघाताची माहिती मिळताच तानाहूनचे पोलीस अधीक्षक बीरेंद्र शाही हे फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ लष्करालाही बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले.

पोलीस, लष्कर आणि स्थानिकांनी बचावकार्य करून 27 मृतदेह नदीतून बाहेर काढले. मात्र नदीच्या पुरात काही भाविक वाहून गेल्याची शक्यता असून त्यांच्या शोधासाठी बोटी पाठवण्यात आल्या आहेत. या अपघातात 16 जण जखमी झाले असून त्यांना नेपाळ लष्कराच्या हेलिकॉप्टरने तानाहून येथील शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अपघातात बसचा चालक आणि वाहकही ठार झाले.

जळगाव प्रशासन उत्तर प्रदेश, नेपाळच्या संपर्कात

अपघाताचे वृत्त कळताच जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गोरखपूरचे जिल्हाधिकारी कृष्णा करुणेश यांच्याशी संपर्क साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील आदींनी प्रशासनाशी संपर्क करून मदतकार्याची माहिती घेतली. जळगाव येथून एक प्रांत अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक तातडीने नेपाळ सीमेवर रवाना करण्यात आले असून जखमींना वैद्यकीय सुविधा देणे, अपघातातील मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी समन्वयाचे काम हे दोन अधिकारी करतील.

बस मालकाने दिली माहिती

ट्रॅव्हल्सचे मालक विष्णू केसरवानी यांनी आमच्या तीन बस गोरखपूर येथून नेपाळला गेल्या होत्या, अशी माहिती दिली. अलाहाबाद, चित्रकूट, अयोध्या असा प्रवास करून हे भाविक गोरखपूरमार्गे सुनौली आणि लुंबिनीला गेले. तेथून नेपाळातील पोखरा येथे पोहोचले. आज या तीनही बस पोखराहून काठमांडूला जात होत्या. बसचा दोन्ही देशातील विमा काढण्यात आला होता, असेही ते म्हणाले.

तानाहून जिल्हा भूस्खलनप्रवण

नेपाळमधील तानाहून जिल्हा हा भूस्खलन प्रवण म्हणून ओळखला जातो. या जिल्हय़ातील 48 भाग अत्यंत जोखमीच्या क्षेत्रात येतात. जून महिन्यात तानाहूनचे जिल्हाधिकारी जनार्दन गौतम यांनी ट्रफिक अलर्ट जारी केला होता. पावसाळय़ात या भागात येणाऱ्या पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला दिला होता.

महाराष्ट्रातील पर्यटकांची बस पोखरा येथून काठमांडूकडे जात असताना मर्स्यांगडी नदीत कोसळली. या बसमध्ये 43 प्रवासी होते.  काही प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून जखमींना काठमांडू तसेच स्थानिक जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. चार जण बेपत्ता आहेत.

z आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव