सातारा विभागातील 240 एसटी बसेस कोकणसाठी आरक्षित, ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द

मुंबई, ठाण्यातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात घेऊन जाण्यासाठी सातारा विभागातून सुमारे 240 एसटी गाडय़ा मुंबईला जाण्यासाठी आरक्षित केल्या होत्या. त्यामुळे जिह्यातील एसटीची वाहतूक यंत्रणा कोलमडली असून, ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. बस स्थानकावर प्रवाशांना तीन ते चार तास ताटकळत बसण्याची वेळ आली आहे.

कोकणात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी सणाला गावी जाण्यासाठी मुंबईत वास्तव्यास असणारे कोकणवासीय 10 दिवस सुट्टी काढून कोकणात उत्सवासाठी जातात. त्यासाठी गणेश चतुर्थीच्या अगोदर तीन ते चार दिवस गावी जाण्यासाठी सज्ज असतात. त्यामुळे मुंबईतील एसटी वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी तीन दिवसांपूर्वी साताऱ्यातील विविध आगारांच्या सुमारे 240 बसेस मुंबई व ठाण्याला रवाना केल्या होत्या.

सध्या या बसेस कोकणवासीयांना घेऊन सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिह्यांत गेल्या आहेत. त्यामुळे जिह्यातील दररोजच्या 50 टक्के फेऱ्या रद्द झाल्या आहेत. ग्रामीण भागात दिवसभरात फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येताना व शहरातून मुंबई, पुण्याला जाण्यासाठी खासगी वाहनचालकांनी गैरफायदा घेत तिकिटाचे दर वाढवीत प्रवाशांची आर्थिक लूट सुरू केली आहे.