ठाण्यात नऊ हजार पोलिसांचा 22 तास वॉच; बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी

गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला मंगळवारी निरोप दिला जाणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढल्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत वाजतगाजत मिरवणुका निघणार आहेत. या विसर्जन मिरवणुकीवर नऊ हजार पोलिसांचा 22 तास विशेष वॉच ठेवण्यात येणार असून सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात राहील. ठाणे शहरासह पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, टिटवाळा येथेही संवेदनशील ठिकाणी जादा पोलीस फौजफाटा ठेवला जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचादेखील वापर पोलीस करणार असून महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले आहे. त्यासाठी साध्या वेशातील पोलीस मिरवणुकीतील हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत.

700 होमगार्ड ऑन फिल्ड
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे हे स्वतः रस्त्यावर उतरणार असून पाच परिमंडळांतील चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, 9 डीसीपी, 18 एसीपी तसेच सुमारे 125 पोलीस निरीक्षकांवर सुरक्षेची कमान सोपवण्यात आली आहे. याशिवाय एसआरपीच्या 5 कंपन्या, 4500 पोलीस कर्मचारी, 700 होमगार्ड आणि एक कंपनी रॅपिड अॅक्शन फोर्स हे विसर्जनासाठी रस्त्यावर असणार आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये शहरातील मुख्य म्हणून नाक्यानाक्यावर, चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

150 जणांना तडीपारीच्या नोटिसा
ईद-ए-मिलाद तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता राहावी यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 150 हून अधिक जणांना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या वतीने संयुक्त मिशन पोलिसांनी हाती घेतले असून त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

सीसीटीव्हीची नजर
सोमवारी ईद-ए-मिलादपाठोपाठ दुसऱ्या दिवशी मंगळवारी गणेश विसर्जन सोहळा असल्याने ठाणे पोलिसांनी खास खबरदारी घेतली असून दोन्ही उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिसांच्या विशेष ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. 17 सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात सकाळपासून विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. त्यासाठी जिल्हा, ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यात आली आहे. जिल्ह्यात 35 हजार 623 हून अधिक घरगुती तर 1 हजार 500 सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन होणार आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत गणेशमूर्तीचे विसर्जन पूर्ण होण्याचा अंदाज आहे. दरम्यान जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि संवेदनशील भागात हालचालींवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. महिला, बालके यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागाने घेतली असल्याची माहिती ठाणे पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.