पाकिस्तानने विक्रम बत्राचे शौर्य मानले, पाकिस्तानी आर्मीची 25 वर्षानंतर जाहीर कबुली

1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानची भूमिका होती, अशी कबुली पाकिस्तानने तब्बल 25 वर्षांनंतर दिली आहे. तसेच या युद्धात हिंदुस्थानचे शहीद कॅप्टन विक्रम बत्रा हे प्राणपणाने लढले होते, असे स्पष्ट करत त्यांचे युद्धातील शौर्यही पाकिस्तानने मानले आहे. पाकिस्तानच्या या कबुलीनंतर. आता आंतरराष्ट्रीय न्यायालयानेही पाकिस्तानला न्याय काय असतो हे दाखवून द्यावे, असे पॅप्टन विक्रम बत्रा यांचे वडील गिरधारीलाल बत्रा यांनी म्हटले आहे.

कारगिल हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका नव्हती, मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने तो हल्ला केला होता, असे पाकिस्तानने म्हटले होते. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला प्रलंबित आहे. आता पाकिस्तानने उघडपणे कबुलीजबाब दिल्याने शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांना न्याय द्यावा अशी मागणी गिरधारीलाल बत्रा यांनी केली आहे. कारगिल युद्ध पाकिस्तानी सैन्यानेच सुरू केले होते. हेदेखील पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल असिम मुनीर यांनीच मान्य केले आहे. असिम यांनी रावळपिंडी येथे पाकिस्तानच्या संरक्षण आणि शहीद दिवस कार्यक्रमादरम्यान कारगिल युद्धासह हिंदुस्थानसोबत झालेल्या विविध  संघर्षाचा उल्लेख केला, दरम्यान, कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्यांनी काबील गेलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी हिंदुस्थानने ऑपरेशन विजय सुरू केले होते. तब्बल तीन महिने चाललेल्या या युद्धात हिंदुस्थानने पाकिस्तानचा दारूण पराभव केला होता.

कारगिल युद्धात 527 हिंदुस्थानी सैनिक झाले होते शहीद

संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर हिंदुस्थानी लष्कराने ताबा मिळवला होता. हिंदुस्थानी लष्कराच्या तीन तुकडय़ांनी 18 ग्रेनेडियर्स, 2 नागा आणि 8 शिख बटालियनने जोरदार प्रत्युत्तर देत, गोळीबार करत हा प्रदेश ताब्यात घेतला होता. अखेर 5 जुलै रोजी शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली होती. या युद्धात तब्बल 527 हिंदुस्थानी जवान शहीद झाले होते. तर पाकिस्तानमधील मृतांचा आकडा 450 इतका होता.