19 वर्षीय तरुणीला गर्भपातास उच्च न्यायालयाने परवानगी दिली. प्रेमसंबंधातून गर्भधारणा झाली होती. शिक्षण पूर्ण करून करिअर करायचे आहे. करिअर झाल्यावर प्रियकरासोबत लग्न करणार, पण आता सिंगल मदर म्हणून समाजाची धास्ती, अशी विविध कारणे देत या तरुणीने गर्भपातास परवानगी मागितली होती.
गर्भपातास परवानगी मिळावी म्हणून पुणे येथील या तरुणीने अॅड. तेजस दांडे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने ही याचिका मंजूर केली. गर्भधारणा तरुणीसाठी मासनिक ताण देणारी आहे. गर्भपात करण्यास कोणतीही शारीरीक अडचण नाही. तरुणीचा तिच्या शरीरावर पूर्ण अधिकार आहे. गर्भपाताचा निर्णय ती घेऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गर्भपातासाठी आई-वडील व प्रियकराच्या परवानगीची आवश्यकता नाही. गर्भपाताची संपूर्ण प्रक्रिया तिला समजावण्यात आली आहे. तिने गर्भपातास होकार दिला आहे. आम्ही या प्रक्रियेस परवानगी देत आहोत, असे खंडपीठाने नमूद केले.
काय आहे प्रकरण
याचिकाकर्ती तरुणी बलात्कार पीडित नाही. मी सामान्य कुटंबात राहते. बाळ जन्माला आल्यास अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. भारतीय संस्कृतीत सिंगल मदरला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भ 26 आठवडय़ांचा आहे. गर्भपातास परवानगी द्यावी, अशी मागणी तरुणीने याचिकेत केली होती.
वैद्यकीय अहवाल
– बाळाला कोणतेही व्यंग नाही. गर्भपात करताना बाळ जन्माला येऊ शकते.
– या प्रक्रियेत बाळाला धोका येऊ शकतो. बाळाला मानसिक किंवा शारीरीक व्याधी होऊ शकते.
– वैद्यकीय पद्धतीने किंवा शस्त्रक्रियेने गर्भपात शक्य आहे.
दत्तक देण्याचा निर्णय तरुणी घेऊ शकते
बाळ जन्माला आल्यास त्याला दत्तक दिले जाईल, असे तरुणीचे म्हणणे आहे. गर्भपाताच्या प्रक्रियेत बाळ जन्माला आल्यास त्याबाबत तरुणीने निर्णय घ्यावा. आम्ही यासंदर्भात काहीही आदेश देत नाही आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.