धुळे – बॅनर फाडल्यावरून दंगल, भाजप आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; 19 पोलीस जखमी

जागतिक आदिवासी दिनानिमित्त (World Tribal Day) लावण्यात आलेले बॅनर फाडल्याच्या संशयावरून धुळ्यामध्ये दोन गटात दंगल उसळली. शिरपूर (Shirpur) तालुक्यातील सांगवी (Sangvi) या गावामध्ये गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. सध्या येथे तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी येथे आदिवासी दिनानिमित्त बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर इतर समाजाच्या लोकांनी फाडल्याचा संशय आल्याने आदिवासी समाजाची लोकं रस्त्यावर उतरली. आदिवासी समाजाच्या जवळपास 400 ते 500 लोकांच्या जमावाने मुंबई-आग्रा महामार्ग (Mumbai-Agra highway) रोखून धरला. त्यामुळे महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर जमावाने महामार्गाच्या बाजुला असणाऱ्या गावाकडे आपला मोर्चा वळवला आणि दगडफेक सुरू केली. यावेळी दोन गट आमनेसामने आले.

दोन्ही बाजुने एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. दंगलीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक केली. तसेच घटनास्थळी दाखल झालेले भाजप आमदार काशिराम पावरा (MLA Kashiram Pawara) आणि तहसीलदारांच्या ताफ्यावरही हल्ला चढवला.

जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये आमदार, तहसीलदार यांच्यासह पोलिसांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच तीन पोलीस अधिकाऱ्यांसह 19 पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिस्थिती चिघळल्याने पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास परिस्थिती नियंणात आली अशी माहिती एसपी संजय बारकुंड यांनी दिली.

दरम्यान, दीड तासांहून अधिक काळ ठप्प असलेला महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 65 जणांचा शोध सुरू आहे. सध्या जखमी पोलिसांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गावातही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे संजय बारकुंड यांनी सांगितले.