पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत येत असलेल्या आठ तालुक्यांतील तब्बल 18 हजार विद्यार्थी अजूनही गणवेशापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत हे गणवेश अजूनही पुरवण्यात आलेले नाहीत. गणवेश तयार असल्याचे महामंडळाचे म्हणणे असले तरी ते विद्यार्थ्यांपर्यंत का पोहोचले नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत असून शाळा सुरू होऊन पाच महिने झाले तरी विद्यार्थी गणवेशाविनाच आहेत. यानिमित्ताने शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
एकीकडे योजनांचा धडाका लावत असल्याचे चित्र भासवणारे सरकार दुसरीकडे विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित ठेवत असल्याने पालक वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील पहिली ते आठवीच्या 1 लाखा 66 हजार 992 विद्यार्थ्यांसाठी गणवेश मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत शाळा स्तरावर १ लाख 45 हजार ३५६ गणवेश वाटप केले आहे. बाकीचे अजूनही करण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकारच्या पोकळ धोरणांचा फटका विद्यार्थी वर्गाला सहन करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांना गणवेश नसल्याने ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थी जुने फाटके कपडे घालूनच शाळेला जात आहेत. त्यातच दिलेल्या गणवेशामध्ये दोन टक्के गणवेश डिफॉल्ट ठरलेले आहेत. त्यामुळे एकूण विद्याथ्यपैिकी दोन टक्के विद्यार्थ्यांना सध्या तरी गणवेश मिळणे दुरापास्त होणार आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, तलासरी, वसई, वाडा येथील गोरगरीब कुटुंबातील मुले जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यसह गणवेश पुरवण्याची पुरेपूर जबाबदारी सरकारची असताना सरकार निद्रिस्त असून या विद्यार्थ्यांना गणवेश न देता ते गरीब असल्याची जाणीव करून देत असल्याचे आरोपही पालक वर्ग करत आहेत.
महिला आर्थिक विकास महामंडळाकडे बोट
पालघर जिल्ह्यातील पहिली ते आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश पुरवण्यात येतात. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी वर्गासाठी गणवेश शिवून देण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोकसंचालित साधन केंद्र यांच्याकडे होते. मात्र अजूनही १८ हजारांच्या जवळपासचे गणवेश विद्यार्थ्यांना वाटप न झाल्याने साधन केंद्राच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.