अपक्षांपुढे आव्हान अनामत रक्कम वाचविण्याचे, 16.67 टक्के मते आवश्यक; …तर विजयी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होऊ शकते

निवडणुकीत जर उमेदवार निवडून आला असेल. परंतु सर्व उमेदवारांना मिळून पडलेल्या एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा कमी मते मिळाली असल्यास विजयी उमेदवाराचीही अनामत रक्कम जप्त होऊ शकते.

विधानसभा निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून उभे राहत हजारो उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये वैध ठरलेल्या उमेदवारांना आता निवडणूक चिन्हांची प्रतीक्षा आहे. मनासारखं चिन्ह मिळाल्यावर अपक्ष उमेदवारांपुढे निवडणुकीत विजयी होण्यापेक्षा मोठ आव्हान हे अनामत रक्कम वाचवण्याच राहणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या सर्वसाधारण गटातील उमेदवारास रक्कम 10 हजार रुपये तर अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारो 5 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. ही अनामत रक्कम वाचवण्यासाठी एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश म्हणजेच 16.67 टक्के मते मिळवण गरजेचं आहे, नाही तर अनामत रक्कम जप्त होते.

उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरवून नाकारले गेले तर अनामत रक्कम परत मिळते. उमेदवाराने विहित कालावधीत उमेदवारी मागे घेतली असल्यास अनामत रक्कम परत मिळते.  मतदानाच्या आधी उमेदवार मृत्यू पावला तर अनामत रक्कम त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीस परत केली जाते. जे उमेदवार निवडून आलेले नाहीत, मात्र निवडणुकीत सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा जास्त मते मिळाली असतील, तरीदेखील अनामत रक्कम परत मिळेल.