पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीत उसळलेल्या हिंसाचारात सकाळपासून 15 जणांचा मृत्यू

पंचायत निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये आज मतदान होत आहे. एकूण 63,229 ग्रामपंचायतींच्या जागा, 9,730 पंचायत समितीच्या जागा आणि 928 जिल्हा परिषदेच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. मतदानासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी होती. मात्र, दुसरीकडे निवडणुकीत विविध ठिकाणी उसळलेल्या हिंसाचारात सकाळपासून 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

पश्चिम बंगालमध्ये विविध ठिकाणांहून तोडफोड आणि हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. अज्ञात हल्लेखोरांनी बूथ 6/130, बारविटा प्राथमिक शाळेची तोडफोड केल्याचा आरोप आहे. काही ठिकाणांहून बूथ लुटल्याचेही वृत्त येत आहे. पंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महिन्याभरात झालेल्या हिंसाचारामध्ये पश्चिम बंगाल मध्ये 20 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. स्थिती आणखी गंभीर होऊ नये म्हणून राज्यभरात 1.35 लाख जवान तैनात करण्यात आले आहेत.