धनाढ्य, उद्योगपती हाच मोदींचा परिवार; संजय राऊत यांचा घणाघात

लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याने आता मोदी परिवाराची राजकारणात चर्चा होत आहे. मी आहे मोदींचा परिवार असे अनेक भाजप नेत्यांनी सोशल मिडीच्या स्टेटसवर ठेवले आहे. मात्र, देशातील 140 कोटी जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिवार नाही. मोदी यांचा परिवार धनाढ्य, उद्योगपती, श्रीमंत यांचाच आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नते, खासदार संजय राऊत यांनी केला.

वर्षाला 2 कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र, देशातील 80 कोटी लोकं बेरोजगार आहेत. त्यांना रोजगार देण्याऐवजी सरकार 80 कोटी जनतेला 5 किलो धान्य भिकाऱ्यांसारखे मोफत देत आहे. हाच मोंदीचा परिवार आहे काय, गरीब असलेल्या आपल्या परिवाराला अधिक गरीब करायचे आणि त्यांना दारात भीक मागायला लावायचे हाच त्यांचा परिवार आहे काय, असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच आता या फसव्या आश्वासनांना जनता फसणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

देशातील 140 कोटी जनता ही मोदी यांचा परिवार नाही, त्यांचा परिवार वेगळाच आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, विमानतळे, एलआयसी ज्यांना विकले आहेत, तो मोदींचा परिवार आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि इतर राज्यातील खासदार, आमदारांना 50 खोके देत विकत घेतले आहे, तो मोदींचा परिवार आहे. मणीपूर हा त्यांच्या परिवाराचा भाग नाही. दोन वर्षांपासून मणीपूर हिंसाचाराने होरपळत आहे. अशांतता, हिंसाचार, महिलांवर अत्याचार होत असलेला मणीपूर त्यांच्या परिवाराचा भाग नाही काय, असा सवालही त्यांनी केला.

लाखो कश्मिरी पंडित घरापासून दूर शिबीरात राहात आहेत. त्यांना त्यांची घरे परत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. ते कश्मिरी पंडित यांच्या परिवारात नाहीत का, परिवारातील बेरोजगारांना वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, ते आजही बेरोजगार आहेत. हे बेरोजगार त्यांच्या परिवाराचा भाग नाहीत का, त्यांचा परिवार कोणता आहे आणि त्यात कोण आहेत, हे जनतेला माहिती आहे. श्रीमंत, धनिक,शेठ, मोठे व्यापारी, उद्योगपती हा त्यांचा परिवार आहे. त्यांच्यासाठी खोटी कामे करणारे आणि अंधभक्त हा त्यांचा परिवार आहे. त्यामुळे देशातील 140 कोटी जनता त्यांच्या परिवारात येत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

नितीन गडकरी परखड आणि स्पष्टवक्ते नेते आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. ते दिल्लीची गुलामी पत्करणार नाही, असा त्यांचा स्वभाव आहे. आम्ही त्यांना ओळखतो. काही वेळा त्यांचे आणि आमचे मतभेद झाले असतील, पण आम्ही त्यांच्यासोबत काम केले आहे. ते विकासाला महत्त्व देतात, ढोंगबाजी आणि फसवणुकीला महत्त्व देत नाहीत. आज देशात जो विकास दिसतोय, त्यात मोठे योगदान गडकरी सांभाळात असलेल्या रस्ते निर्माण मंत्रालयाचेआहे. गडकरींनी निर्माण केलेल्या अनेक राष्ट्रीय प्रकल्पांची उद्घाटने पंतप्रधान मोदी यांनी केली, पण त्या कार्याचे श्रेय त्यांनी गडकरींना दिले नाही. अशा गडकरींचे आव्हान म्हणा की भीती, ही मोदी-शहांच्या व्यापार मंडळास वाटणारच. त्याच भीतीमुळे 2024 च्या निवडणुकीतून नितीन गडकरींना डावलायचे असे ठरवलेले दिसते, असेही संजय राऊत म्हणाले.