‘मंकीपॉक्स’ रुग्णांसाठी सेव्हन हिल्समध्ये 14 बेडचा वॉर्ड तैनात; अद्याप रुग्ण नाही, तरीही पालिका सतर्क

जगभरात मंकीपॉक्स आजाराने थैमान घातले असताना मुंबईत दररोज हजारोंच्या संख्येने परदेशातून प्रवासी येत असल्यामुळे पालिकाही सतर्प झाली आहे. मंकीपॉक्स रुग्णांसाठी अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात 14 बेडचा विशेष वॉर्ड तैनात करण्यात आला आहे. शिवाय विमानतळावरही संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य तपासणी कक्ष तैनात करण्यात आला आहे. मुंबईत सद्यस्थितीत मंकीपॉक्सचा रुग्ण किंवा संशयित आढळला नसला तरी खबरदारी म्हणून या उपाययोजना केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पाकिस्तान आणि स्वीडन या देशात ‘मंकीपॉक्स’ या संसर्गजन्य आजाराने बाधित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई महानगरात विदेशातून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. जगातील काही देशात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा वेग आणि तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने हिंदुस्थानमधील सर्व राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाकडूनदेखील ‘मंकीपॉक्स’ सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून सज्जता ठेवण्यात येत आहे. मुंबईत अद्याप रुग्ण किंवा संशयित आढळला नसल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर परदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरणासोबत नियमितपणे समन्वय आणि संपर्प साधण्याच्या सूचना पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. मंकीपॉक्स खबरदारीबाबत पालिका, विमानतळ प्रशासन, पालिकेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीनंतर कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे.

अशी आहेत लक्षणे

ताप, लसीका ग्रंथी सूज, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला अशी लक्षणे आढळतात. तर कुपोषण, कृमी प्रादुर्भाव आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांमध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

मंकीपॉक्स संसर्ग हा ऑर्थेपॉक्स या डीएनएच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे दोन्ही प्राणी विषाणूचे नैसर्गिक स्रोत आहेत.

अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी 1 ते 2 दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांच्या खपल्या पडेपर्यंत किंवा पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.

असा होतो प्रसार

थेट शारीरिक संपर्क, शरीरद्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, अप्रत्यक्ष संपर्क, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यामार्फत, श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे, बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळेदेखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.