फुगा फुगवताना तोंडात गेल्याने 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

वाढदिवस असो अथवा कोणताही कार्यक्रम फुग्यांचा वापर सर्रास केला जातो. विविध रंगांच्या आणि आकाराच्या फुग्यांमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा येते. लहाण मुलांना त्याचे विशेष आकर्षण असते. मात्र कार्यक्रमांची शोभा वाढवणारा हा फुगा मृत्यूच कारण ठरला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एका फुग्यामुळे 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यामध्ये घडली आहे. 13 वर्षीय विवेक कुमार हा सिद्धपूरगडमधील सरकारी शाळेमध्ये शिकत होता. गुरुवारी (5 सप्टेंबर) तो नेहमी प्रमाणे शाळा सुटल्यावर घरी जायला निघाला. शाळेच्या गेटवर आला असता त्याने फुगा फुगवायला सुरुवात केली. मात्र फुगा फुगवताना फुगा त्याच्या तोंडात गेला त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल.

घटनेची माहिती मिळताच शिक्षकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. प्राथमीक उपचार केल्यानंतर विवेकला पंजाबला हलवण्यात आले. त्याला पठानकोठमधील अमनदीप हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांना विवेकच्या तोंडातून फुगा काढण्यात यश आले. मात्र या दरम्यान विवेकची तब्बेत जास्त बिघडली. अखेर गुरुवारी रात्री 11 वाजता त्याचा मृत्यू झाला. विवेकच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबियांसहीत संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.