अयोध्येत 13 हजार एकरचा जमीन घोटाळा; सैन्यदलासाठी राखीव जमीन अदानींना विकली

देशातील बंदरे, विमानतळे, रेल्वे, टोल मित्रांच्या नावावर केल्यानंतर आता मोदींनी प्रभू श्रीरामाच्या घरातच डल्ला मारून तब्बल 13 हजार एकरचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मोदींनी अयोध्येतील सैन्यदलासाठी राखीव असलेली तब्बल 13 हजार 391 एकर जमीन उद्योगपती गौतम अदानी, योगगुरू आणि उद्योजक बाबा रामदेव आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना विकल्याची माहिती एका प्रतिष्ठत इंग्रजी वृत्तपत्राने केलेल्या आरटीआयद्वारे समोर आली आहे. विशेष म्हणजे जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर ती राज्यपालांच्या अधिकाराखाली डिनोटीफाईड करून घेण्यात आली. प्रभू श्रीरामाच्या नगरीतील जमिनीचा सौदा करून मोदींनी स्वतः तर भ्रष्टाचार केलाच, परंतु मित्रांना आणि मंत्र्यांनाही कोटय़वधी रुपयांचा मलिदा मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

मोदींनी भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या – काँग्रेस

मोदी सरकारने अयोध्येतील सैन्यदलासाठी राखीव जमिनीचा सौदा करून भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या,  असा आरोप काँग्रेसने ‘एक्स’वरून केला आहे. जमीन सैन्यदलासाठी होती त्यामुळे या जागेवर कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई होती, परंतु  मोदींनी अतिशय चतुरपणे उत्तर प्रदेशच्या राज्यपालांच्या अधिकाराखाली ही जमीन डीनोटीफाईड करून घेतली. त्यामुळे त्यांनी आता भगवान रामाच्या नगरीलाही मित्रांशी संधान साधून व्यापाराचा अड्डा बनवल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

नेमका कसा झाला व्यवहार?

राम मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावर माझा जमथरा नावाच्या गावात अदानी समूहाची कंपनी होमक्वेस्ट इन्फ्रास्पेसने जवळपास 1.4 हेक्टर जमीन खरेदी केली. हा व्यवहार नोव्हेंबर 2023 मध्ये माजी भाजप आमदार सी. पी. शुक्ला यांच्या फर्मसोबत झाला होता.

शुक्ला यांच्या फर्मने ही जमीन वर्षभरापूर्वी  खरेदी केली होती. होमक्वेस्ट इन्फ्रास्पेसमधून यापूर्वी याच गावात फेब्रुवारी 2022 मध्ये श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगनेही 5.31 हेक्टर जमीन खरेदी केली.

हरयाणाच्या योग आयोगाचे अध्यक्ष जयदीप आर्य आणि राकेश मित्तरसमवेत चार जणांनी माझा जमथरामध्ये 3.035 हेक्टरपर्यंतची जमीन जुलै 2023 मध्ये खरेदी केली होती. हे चारही जण योगगुरू बाबा रामदेव यांच्या भारत स्वाभिमान ट्रस्टशी निगडित आहेत.

ज्या परिसरातील जमिनीचा सौदा करण्यात आला त्या परिसरातील जमीन उत्तर प्रदेश सरकारने नोटीफाईड किंवा बफर झोन म्हणून अधिसूचित केली होती. ही जमीन सैन्यदलाच्या फिल्ड फायरिंग आणि तोफखाना प्रॅक्टिससाठी आरक्षित जमीनींच्या आसपास आहेत.

अखिलेश यादव, प्रियांका गांधी यांनी साधला होता निशाणा

गेल्याच महिन्यात अयोध्येतील जमिनीच्या व्यवहारावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी एनडीए सरकारवर निशाणा साधला होता. अयोध्येतील जमिनीतून प्रचंड नफा कमावण्यासाठी येथील जमिनी धनदांडग्यांना विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.