सी-व्हिजिल अॅपवर आचारसंहिता भंगाच्या 1259 तक्रारी

election-logo-code-of-conduct

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 15 ते 25 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल अॅपवर एकूण 1259 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 1250 तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

100 कोटी 40 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण 100 कोटी 40 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

चेंबूरमध्ये पकडली 30 लाखांची रोकड

चेंबूर परिसरात आज एका खासगी कारमधून घेऊन जात असलेली जवळपास 30 लाखांची रोकड पोलीस व निवडणूक आयोगाच्या पथकाने पकडली. आयकर विभागाला याबाबत कळवण्यात आले असून ही रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  आज चेंबूर परिसरातील एका पेट्रोल पंपजवळ पोलिसांनी ही कार पकडली.  दोघे जण ही रोकड घाटकोपरहून दादरच्या दिशेने घेऊन चालले होते असे समजते.  निवडणूक काळात 50 हजारांहून अधिकची रक्कम घेऊन जायची असल्यास आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे गरजेचे असते.