12 हजार इंग्रज उपचारासाठी हिंदुस्थानात येणार!

ब्रिटनमध्ये 15 हजार डॉक्टरांच्या कमतरतेमुळे एनएचएस (नॅशनल हेल्थ सर्व्हिस) ढासळली आहे. गत 6 महिन्यांत डॉक्टर व परिचारिकांनी 8 वेळा संप केल्याने रुग्णांची वेटिंग लिस्ट वाढून 70 लाख झाली आहे. त्यामुळे ब्रिटनचे रुग्ण चांगल्या व स्वस्त उपचारासाठी हिंदुस्थानात येत आहेत. एनएचएसच्या परदेशी आकडेवारीनुसार, या वर्षी मार्चपर्यंत ब्रिटनहून 3 हजार रुग्ण उपचारासाठी हिंदुस्थानात आधीच आले आहेत. हिंदुस्थान व ब्रिटन यांच्यात वैद्यकीय कराराचे प्रयत्न सुरू आहेत. लंडन स्कूल ऑफ हायजीन आणि आयआयएम बंगळुरू यासाठी अहवाल तयार करत आहेत. लवकरच याचा अहवाल ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना सोपवला जाईल. करार झाल्यानंतर एनएचएस ब्रिटनहून हिंदुस्थानात जाणाऱयांच्या उपचाराचा खर्च उचलेल. यामुळे अधिक रुग्ण हिंदुस्थानात येतील.

शस्त्रक्रिया स्वस्त

मला हृदयविकार होता. एनएचएस वेटिंग लिस्ट 8 महिन्यांची होती. लंडनच्या खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी 20 लाख खर्च होता. बंगळुरूमध्ये जाऊन पाच लाख रुपयांत शस्त्रक्रिया करून घेतली. यात विमान तिकिटाचा खर्चही समाविष्ट होता, असे लंडनचे जॉर्ज मार्शल यांनी सांगितले.

गेल्या वर्षी ब्रिटनहून सुमारे 1200 रुग्ण उपचारासाठी हिंदुस्थानात आले होते. या वर्षी हा आकडा दहापट वाढून 12 हजार होण्याची शक्यता आहे.