उद्या अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 27 जून रोजी सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. यंदा विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारताना किंवा घेतलेला प्रवेश रद्द करताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळूनही न घेतल्यास विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी बाद होणार आहे. तसेच एखाद्याने निश्चित केलेला प्रवेश रद्द केल्यास असे प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी बाद ठरविले जाणार आहेत.

पहिल्या गुणवत्ता यादीनुसार अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांनी 27 जून ते 1 जुलै सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. पहिल्या पसंतीच्या कॉलेजव्यतिरिक्त अन्य पसंती दिलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा नसल्यास विद्यार्थी पुढील प्रवेशफेरीची वाट पाहू शकतो. या मुदतीत विद्यार्थी पुढील प्रवेशफेरीसाठी नोंदणी आणि अर्ज भाग 1 भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतो.

– कोटा पसंती दिलेल्या विद्यार्थ्यांची कोटावर गुणवत्ता यादीदेखील कॉलेजस्तरावर 27 जून रोजी जाहीर होणार आहे. प्रवेश मिळालेले विद्यार्थी संबंधित कॉलेजमध्ये संपर्क साधून आपला कोटांतर्गत प्रवेश घेऊ शकतात. ऑनलाइन प्रवेशासाठी 2 लाख 62 हजार 899 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज लॉक केला आहे, तर 2 लाख 38 हजार 953 विद्यार्थ्यांनी कॉलेज पसंतीक्रम नोंदविले आहे. अल्पसंख्याक, इनहाऊस आणि व्यवस्थापन कोटय़ांतर्गत 38 हजार 183 विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली असून यातील 13 हजार 50 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.