राज्य सहकारी बँकेत 13.5 टक्के बोनस, 113 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

राज्य बँकेचा 113 वा वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा झाला. बँकेच्या 113 व्या वर्धापन दिनानिमित्त कर्मचाऱ्यांनी 2,139 इतकी ग्राहकांची वैयक्तिक नवीन बचत आणि चालू खाती उघडली. तसेच 771 कोटींच्या नवीन ठेवींचे संकलन केले. बँकेला यंदा 615 कोटींचा नफा झाला असून बँकेचा एकूण व्यवसाय तब्बल 57 हजार कोटींच्या वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांना 13.5 टक्के बोनस देण्याची घोषणा करण्यात आली.

राज्य बँकेच्या जडणघडणीत बँकेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलदास ठाकरसी, बँकेचे पहिले व्यवस्थापकीय संचालक वैकुंठभाई मेहता, बँकेचे पहिले अध्यक्ष प्रा. धनंजय गाडगीळ यांचा मोलाचा वाटा आहे. बँकेने  शेतकऱ्यांना औपचारिकतेचा कोणताही अडसर न ठेवता कर्जे मंजूर केली आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे राज्य बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्राहकाभिमुख काम करावे, असे आवाहन बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केले. कार्यक्रमाला बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, मुख्य सरव्यवस्थापक डॉ. अशोक माने आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरव्यवस्थापिका डॉ. तेजल कोरडे यांनी केले.