दुचाकीचोरांची टोळी जेरबंद, चौघांना अटक; राहुरी, श्रीरामपुरातील 11 गुन्हे उघडकीस

दुचाकी चोरणाऱया टोळीतील तिघे तसेच चोरीच्या मोटारसायकलवर खोटी नंबर प्लेट बसवून देणाऱया रेडियम दुकानदाराला राहुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले. या घटनेने जुन्या दुचाकीविक्रीचे बेकायदा धंदे करणारे तसेच रेडियम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. चारही आरोपींना सोमवारी राहुरी न्यायालयात उभे केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या टोळीकडून पोलिसांनी 11 दुचाकी जप्त करून राहुरी आणि श्रीरामपुरातील 11 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

दुचाकी चोरी व राहुरी हे समीकरण सर्वश्रुत आहे. चोरीला गेलेल्या मोटारसायकल मूळ मालकाला परत देण्यासाठी मांडवली करणाऱया असंख्य घटना राहुरीत घडल्या आहेत. मात्र, वाहनचोरीचे हे सत्र आजवर राहुरी पोलिसांना थांबविण्यात यश आलेले नाही. जुन्या मोटारसायकल खरेदी-विक्रीची बेकायदेशीर दुकानदारी करणाऱयांची संख्या राहुरी तालुक्यात उदंड झाल्याने मोटारसायकल चोरीच्या गुह्याला खतपाणी मिळाले आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राहुरी पोलिसांनी दोघा संशयित तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविल्याने मोटारसायकल चोरीचे एक प्रकरण प्रथमच उघडकीस आले आहे. नावेद इब्राहिम शेख (वय 23, रा. जातप), मंगेश विष्णू ठाकर (वय 22, रा. सोमय्या फार्म तालुका, राहुरी) या दोघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी चोरलेली मोटारसायकल आरोपी किशोर अंकुश पवार (वय 19, रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर) त्याच्याकडे दिल्याचे सांगितल्याने पवारलादेखील पोलिसांनी अटक केली आहे.

या तपासादरम्यान सुरुवातीला दोन मोटासायकल जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच यातील आरोपी नावेद शेख याने देवळाली प्रवरा व टाकळीमियाँ या ठिकाणावरून आणखी दोन मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. शेख याने सदर गुह्यात चोरलेल्या मोटारसायकलवर ‘कलर्स रेडियम’ राहुरी फॅक्टरी येथे जावेद रज्जाक शेख याच्याकडून बनावट नंबर प्लेट लावून विल्हेवाट लावल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी जावेद शेख यालाही अटक केली. या तपासादरम्यान आरोपी नावेद शेख याने आणखी नऊ चोरलेल्या मोटारसायकल काढून दिल्याने राहुरी पोलिसांनी एकूण 11 मोटारसायकल जप्त करून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील व श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील 11 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक वैभव कुलुबर्मे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर. ठेंगे, सहायक निरीक्षक देवेंद्र शिंदे, रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, उपनिरीक्षक धर्मराज पाटील, सहायक फौजदार तुळशीराम गीते, सुरज गायकवाड, संदिप ठाणगे, राहुल यादव, प्रवीण बागुल, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सचिन ताजणे, गोवर्धन कदम, जयदीप बडे, अजिनाथ पाखरे, सतीश कुऱहाडे, अंकुश भोसले, सचिन धनाड, संतोष दरेकर या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास सहायक फौजदार आहेर करत आहेत.