ठाणे शहरात सुमारे 100 एकर वनजमिनीचा घोटाळा झाला असून ती अवघ्या 31 कोटींमध्ये विकण्यात आली आहे. यामध्ये काही शासनाचे बडे अधिकारी, एका ट्रस्टचा ट्रस्टी आणि बिल्डर यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यासंदर्भात आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून ठाण्यात झालेला वनजमिनीचा घोटाळा उघडकीस आणण्याचे सूचक विधान केले आहे. ठाण्यामध्ये येत्या काही दिवसांतच एक मोठा स्कॅम उघडकीस येणार आहे. महाराष्ट्र राखीव वने असलेली जमीन एका मोठ्या ट्रस्टच्या मुख्य ट्रस्टीने विकण्याचे कारस्थान केले आहे. त्यामध्ये सगळे अधिकारीही सामील झालेले आहेत. 31 कोटी रुपयांमध्ये ही जमीन विकण्यात आलेली आहे. राखीव वने विकण्याचा अधिकार कोणाला आहे, त्यास परवानगी देण्याचा अधिकार कोणाला आहे, यामध्ये ट्रस्टी, परवानगी देणारे, विकत घेणारे या सर्वांनी मिळून हा घोटाळा केला असून लवकरच संपूर्ण कागदपत्रांसह कायदेशीररीत्या तो उघड करण्यात येणार आहे. आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी या घोटाळ्यात कोणाचा सहभाग आहे याची चर्चा सुरू झाली आहे.
ज्या जमिनीबाबत मी खाली ट्वीट केले आहे, ती जमीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये असून तिथे दाट जंगल (झाडी) होती. ती झाडे कापण्यात आली असून आता त्या जमिनीपर्यंत जाण्यासाठी रस्तादेखील बनविण्यात आलेला आहे. मला हेच कळत नाही की, वनखात्याच्या ताब्यात असलेल्या जमिनीवरील झाडे कशी काय… https://t.co/B6DiaNL9cO
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 18, 2024