हिंदुस्थानच्या खेळाडूंना धक्का! ‘या’ 10 खेळांना Commonwelth Games मधून वगळलं

Commonwelth Games चा 23 वा हंगाम ग्लासगोमध्ये 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत रंगणार आहे. मात्र, बजेटचं गणीत कोलमडल्यामुळे या स्पर्धेत फक्त 10 खेळांचा समावेश करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हिंदुस्थानचं वर्चस्व असणाऱ्या खेळांना स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे पदक विजेत्या खेळाडूंचा हिरमोड झाला आहे.

Paris Olympics 2024 मध्ये हिंदुस्थानच्या खेळाडूंनी कुस्ती, नेमबाजी आणि हॉकी या खेळांमध्ये पदकांची लयलूट केली होती. त्याचबरोबर बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे आगामी स्पर्धांमधून या खेळांमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांमधून या खेळांना काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे हिंदुस्थानसाठी हा मोठा हादरा मानला जात आहे. बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानच्या खेळाडूंनी मागील काही वर्षांमध्ये 10 सुवर्ण, 8 रौप्य आणि 13 कांस्य पदकांसह एकून 31 पदकांची कमाई केली आहे. तसेच नेमबाजी, कुस्ती आणि हॉकीमध्ये सुद्धा खेळाडूंनी लौकिकाला साजेशी कामगिरी करत पदके जिंकली आहेत.

ग्लासगोमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स, स्विमींग, ट्रॅक सायकलिंग, वेटलिफ्टिंग, 3*3 बास्केटबॉल, लॉन बाउल, नेटबॉल, जिम्नॅस्टिक्स, ज्युडो आणि बॉक्सिंग या 10 खेळांचा समावेश करण्यात आला आहे.