मालमत्ता कर थकवला, 1 लाख 9 हजार 234 थकबाकीदारांवर कारवाई

मुंबई महापालिकेने 25 मेनंतरही मालमत्ता कराची थकीत रक्कम न भरणाऱयांवर धडक कारवाई केली असून मालमत्ता कर थकवणाऱ्या 1 लाख 9 हजार 234 थकबाकीदारांना 2 टक्के दंड आकारला आहे. या दंडापोटी महापालिकेच्या तिजोरीत 43 कोटी 99 लाख रुपयांची भर पडली आहे. मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने ही कारवाई केली.

मुंबईत 2023-24 सालातील मालमत्ता कराची थकीत रक्कम भरण्यासाठी मुंबई महापालिकेने 25 मे 2024 पर्यंत मुदत दिली होती. 25 मेपर्यंत थकीत रक्कम न भरल्यास दोन टक्के दंड आकारण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला होता. मात्र पालिकेच्या इशाऱयाकडे दुर्लक्ष करणे थकबाकीदारांना चांगलेच महागात पडले.

n मुंबई महापालिकेचा उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेला जकात बंद झाल्यानंतर पालिकेला मालमत्ता करातून मोठय़ा प्रमाणात महसूल मिळतो. 2023-24 मधील मालमत्ता कर भरण्यासाठी 26 फेब्रुवारी 2024 पासून बिल पाठवण्यास सुरुवात केली आणि 31 मार्च 2024 पर्यंत साडेचार हजार कोटींचे कर वसुलीचे उद्दीष्ट ठेवले होते. मात्र, बिले उशिराने पाठवल्याने 31 मार्चपर्यंत कर भरणा करणे शक्य नसल्याने 25 मे 2024 ही अखेर मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही थकबाकी जमा न केल्यामुळे महापालिकेने 1 लाख 9 हजार 234 थकबाकीदारांवर दोन टक्क्यांप्रमाणे दंड आकारून कारवाई केली.