ठसा – डॉ. सुधीर रसाळ

>> प्रशांत गौतम

समीक्षेच्या क्षेत्रात ज्यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते, साहित्य-समीक्षा क्षेत्रात ज्यांच्या नावाचा आजही दबदबा कायम आहे, ज्यांचा शब्द अंतिम मानला जातो, असे डॉ. सुधीर रसाळ आज 91व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला काल मराठवाडा साहित्य परिषदेने त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी विशेष सत्काराचे आयोजन केले होते. याच समारंभात रसाळ यांच्या ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ या नवीन पुस्तकाचे प्रकाशनही झाले. या पुस्तकात डॉ. रसाळ यांनी आरंभी आपली काव्यविषयक भूमिका विस्ताराने मांडली आहे. अरुण कोल्हटकर, मनोहर ओक, भालचंद्र नेमाडे, तुलसी परब, सतीश काळसेकर, वसंत दत्तात्रय गुर्जर आणि चंद्रकांत पाटील या कवींवर डॉ. रसाळ यांनी सविस्तर भाष्य करून प्रदीर्घ लेखन केले आहे. आजच्या कवींनी रसाळ सरांचे नवे पुस्तक जरूर वाचले पाहिजे. ‘कविता आणि प्रतिमा’ हा डॉ. रसाळ यांच्या पीएच.डीचा विषय होता आणि मार्गदर्शक म्हणून प्रा.वा.ल. कुलकर्णी लाभले होते.1982 साली तो ग्रंथरूपाने मौज प्रकाशनाने प्रकाशित केला. मात्र त्यानंतरही याविषयीचा त्यांचा अभ्यास सुरूच राहिला. पीएच.डी. झाली, पुस्तक आले म्हणजे काम संपले असे नाही. त्यांचा ‘कविता आणि प्रतिमा’ हा संग्रह मराठी साहित्याचा मानदंड म्हणून आजही ओळखला जातो, अभ्यासला जातो. याच संग्रहाने त्यांची समीक्षक ही प्रतिमा ठसवण्याचे महत्त्वाचे कार्य केले. बा.सी.मर्ढेकर हाही त्यांच्या आस्था, अभ्यास आणि आत्मीयतेचा विषय होय. त्याची फलश्रुती म्हणजे…

1- मर्ढेकरांची कविता ः जाणिवांचे अंतःस्वरूप 2- मर्ढेकरांची कविता ः आकलन आणि विश्लेषण 3- मर्ढेकरांचे कथात्मक वाङ्मय ः अशी महत्त्वाची ग्रंथनिर्मिती होय. संशोधनात, समीक्षेत अशा ज्ञानशाखा क्षेत्रात त्यांनी जे योगदान दिले, त्याला आज तोड नाही.

डॉ. रसाळ यांचे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘लोभस’ हा व्यक्तिचित्रण संग्रह. एखाद्या गावाचे अथवा व्यक्तीचे अचूक चित्रण कसे करावे, त्याचा हा वस्तुपाठ होय. महाराष्ट्रातील दिल्ली या पहिल्याच लेखात त्यांनी आताच्या छत्रपती संभाजीनगरचे विस्ताराने शब्दचित्र रेखाटले आहे. हा लेख वाचला की, या शहराचा इतिहास आणि प्रवास आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मराठवाडय़ासह या महानगराला स्वातंत्र्य लढय़ाचा इतिहास लाभला आहे, आणि त्यांचा ऐन उमेदीचा प्रवासही याच काळात सुरू झालेला आहे. जन्म तालुक्यातील वैजापूरचा असला तरी बालपण, शालेय शिक्षण याच शहरात गेले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी हैदराबाद आणि अध्यापनासाठी पुन्हा संभाजीनगर विद्यापीठात झालेली प्रदीर्घ सेवा असा त्यांचा प्रवास मराठी विभागाच्या प्रमुख पदापर्यंत येतो. या लेखातील संभाजीनगर शहराच्या शब्दचित्रणाप्रमाणेच काही लक्षवेधी व्यक्तिचित्रण यात आहे. शिक्षक असलेले वडील, गुरू भगवंतराव देशमुख, शिक्षक प्राचार्य म. भि. चिटणीस, पत्रकार अनंत भालेराव,साहित्याचे पहिले प्राध्यापक वा.ल.कुलकर्णी, मित्र नरेंद्र चपळगावकर, डॉ. गो. मा. पवार अशा व्यक्तींचे व्यक्तिचित्रण या ‘लोभस’ संग्रहात दिसते. लेखनाची प्रवाही आणि रसाळ भाषा,सूक्ष्म निरीक्षण आणि अवलोकन हे या संग्रहाचे खास वैशिष्टय़ तर आहेच, यातील व्यक्ती अथवा गाव आपल्या डोळ्यांसमोर डॉ. रसाळ उभे करतात. श्री. पु. भागवत जन्मशताब्दीनिमित्त राजहंस प्रकाशनाने डिसेंबर 2023 मध्ये ‘वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत’ हा ग्रंथ प्रकाशित केला,ज्याचे संपादन डॉ. रसाळ आणि वसंत पाटणकर यांनी केले. या संपादनाचे खास वैशिष्टय़ म्हणजे यात ‘सत्यकथा’, साप्ताहिक ‘प्रभात’ आणि ‘मौज’ हा प्रदीर्घ कालखंड तीन प्रमुख भागांत विस्ताराने आला आहे आणि त्या विषयाच्या संबंधित जाणकारांनी यात आपले लेखन योगदान दिले आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेत त्यांनी अध्यक्ष म्हणून आणि प्रतिष्ठानचे संपादक म्हणून लक्षणीय योगदान दिले आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद, मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे, पण अ.भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद होण्यासाठी फार उत्साह दाखवला नाही. याबाबतीत त्यांचा नकार कायम आहे. त्यांच्या बाबतीत साहित्य रसिकांनी रसाळ सर अध्यक्ष होण्याचे जे स्वप्न बघितले होते ते मात्र पूर्ण होऊ शकले नाही.