आगळंवेगळं – कापसाची कलाकुसर

>> आशिष बनसोडे

मनुष्य हा कलावंतच असतोप्रत्येकामध्ये कुठली ना कुठली कला असतेच. फक्त त्या कलेला ओळखून जोडीला प्रयत्नांची जोड अन् अपार मेहनत घेतली की, कलेला अंकुर फुटून मग त्याचे वटवृक्ष झाल्यावाचून राहत नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. अनेकांनी वेगवेगळी कला जोपासली आहे. अशीच एक वेगळी कला जोपासली आहे ती भायखळा येथे राहणाऱ्या अपर्णा जैतपाळ यांनी. कापसापासून महापुरूष, देवदेवता आदी हुबेहूब साकारण्याची कलाकुसर त्यांच्यात आहे.

अपर्णा जैतपाळ या वर्किंग वूमन. पश्चिम रेल्वेत अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अपर्णा या कलानिपुण आहेत. विविध कला त्यांना अवगत आहेत. त्या उत्तम नर्तिका, सूत्रसंचालक व निवेदिका आहेत. त्या मालिका, नाटकांमध्ये अभिनय करतात, छान लिखाण करतात. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्या कार्य करतात, पण याचबरोबर त्यांनी एक आगळावेगळा छंद जोपासला आहे. त्यांचा तो छंददेखील हटके असा आहे. त्यांना कापसापासून कलाकृती साकारण्याचा छंद आहे. अपर्णा यांच्या आजी कापसापासून गणपतीच्या गळ्यातील कंठी बनवायच्या. मग अपर्णा यांच्या आईदेखील ते काम करू लागल्या. आईने त्यात नावीन्य आणले आणि जरा हटके कंठी व वस्त्रे कापसापासून बनविण्यास सुरू केली. आजी आणि आईचा वारसा कायम ठेवत अपर्णा यांनीदेखील गणरायाच्या गळ्यातील कापसाची कंठी बनविण्याचे काम नियमित ठेवले आहे. आजही कंठी, देवांची वस्त्र बनविण्याचे काम त्या करतात. दरम्यान कंठी बनवत असताना दोन-अडीच वर्षांपूर्वी अपर्णा यांना वेगळं काहीतरी करवं असं वाटू लागलं. आपण कापसापासून वेगवेगळ्या कलाकृती नक्की बनवू शकतो असे त्यांना प्रकर्षाने जाणवू लागले. मग काय वेळ न दवडता त्यांनी ठरवले आणि थेट कामाला लागल्या. अर्थात त्यांनी सुरुवात गणरायापासून केली.

त्यांनी कापसापासून गणपतीची मूर्ती बनवायचे ठरवले. त्याप्रमाणे पहिल्याच प्रयत्नात त्यांनी कापसापासून बाल गणरायाची सुबक मूर्ती बनवली. त्या कापसापासून बनवलेल्या बाल गणेशाच्या मूर्तीला लोकांची चांगलीच वाहवा मिळाली. अनेकांनी अपर्णा यांची स्तुती करत त्यांच्या पाठीवर थाप दिली. या जरा वेगळ्या कलाकृतीला उत्तम प्रतिसाद मिळू लागल्याने अपर्णा यांचा आत्मविश्वास दुणावला. त्यांनी आणखी कष्ट घेण्यास सुरुवात केली. सोबतीला जिद्द व चिकाटीची जोड देत त्यांनी गणपती, छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठोबा-रखुमाई, पंडित नेहरू आदी महामानवांच्या आकर्षक मूर्ती साकारल्या. जरा हटके कलाकृती असल्याने नागरिकांमधूनदेखील अपर्णा यांना चांगलीच दाद मिळू लागली. अलीकडे उत्तर प्रदेशात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात सहभाग घेऊन अपर्णा यांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या कलेला इंडिया बुक आाफ रेकार्डचा पुरस्कारदेखील मिळाला. कापूस आणि विविध रंगांच्या लोकरीच्या धाग्यांचा वापर करत अपर्णा आकर्षक मूर्ती घडविण्याचे काम करत आहेत. आपल्या विविध कला सांभाळत त्या ही कलादेखील तितक्याच उत्साहाने जोपासत आहेत. कापसापासून पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचत नाही. त्यामुळे काहीही बनवले तरी ते पर्यावरणपूरक असते, असे अपर्णा सांगतात. शिवाय कापसापासून कोणाच्याही अथवा कुठल्याही मूर्ती बनवणे खर्चिकसुद्धा नाही. दोन दिवसांत मूर्ती किंवा कुठल्याही वस्तू बनवता येतात. म्हणजेच ही कला वेळखाऊदेखील नाही. तेव्हा कापसापासून मूर्ती, भेटवस्तू आदी बनविण्यास व ते स्वीकारण्यास नागरिकांनीदेखील पुढाकार घ्यावा असेही जैतपाळ म्हणतात.

[email protected]