आंबेगाव – बिबट्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी

आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे महावितरण कंपनीच्या सबस्टेशन जवळ लौकी रस्त्याने मोटार सायकलवरून जाणाऱ्या आठ नागरिकांवर रविवारी रात्री बिबट्याने झडप घातली. त्यामध्ये पाच जण जखमी झाले असून तीन जण बचावले आहेत. कळंब लौकी या परिसरात आत्तापर्यंत बिबट्याने दुचाकीस्वरांवर हल्ले करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वनविभागाने या परिसरात या घटना होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ऋतुजा सुनील कानडे व राजेंद्र अंबरनाथ कानडे हे दोघे मोटार सायकलवरून कळंब गावाकडे येत होत्या. त्यावेळी बिबट्याने हल्ला केल्यामुळे ऋतुजा मोटार सायकलवरून खाली पडल्या. ऋतुजा कानडे यांच्या उजव्या हाताला, मांडीला, पाठ आणि छातीवर बिबट्याने जखमा केल्या आहेत. तर राजेंद्र कानडे यांच्या उजव्या पायाला जखम झाली आहे. त्यानंतर त्याच ठिकाणाहून विजय विष्णू थोरात व निलेश शंकर थोरात हे दोघे जण मोटार सायकलहून लौकीकडे जात होते. त्याच्या समवेत विजय बाबाजी थोरात हे वेगळ्या मोटार सायकलवर होते. त्यावेळी निलेश यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात त्यांच्या डावा हात, पाय आणि पाठीला जखमा झाल्या. त्यांनी मोठ्याने आरडाओरड केली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे यांच्या घरापर्यत गाडी जोरात पुढे नेली. अनिल कानडे, रामदास वळसे पाटील, विजय थोरात यांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली.

काही वेळानंतर समिक्षा पोपट थोरात व ऋषिकेश संतोष गावडे हे याच रस्त्याने लौकीकडे जात होते. त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. दोघेही मोटार सायकल सकट शेतात पडले. समिक्षाच्या उजवा पाय आणि ऋषिकेशचा उजवा पाय, गुडघ्याला बिबट्याने जखमी केले आहे. त्यानंतर मोटार सायकलहून जाणारे प्रणव संतोष थोरात यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. पण ते थोडक्यात बचावले आहे. दत्ता कानडे यांनी ऋतुजाला तर निलेश कानडे यांनी निलेश थोरात, समिक्षा थोरात आणि ऋषिकेश गावडे यांना तत्काळ मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर राजेंद्र कानडे यांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले आहेत. मंचर वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस, अनुसया उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधीने जखमींची रुग्णालयात विचारपूस केली.

या परिसरात तात्काळ वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावून दोन्हीही हल्लेखोर बिबट्यांना जेर बंद करावे या परिसरात मागील काही महिन्यांपासून बिबट्या नर मादी व बछडे यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे.